कंत्राटी शिक्षकांचे थकलेले मानधन त्वरित द्या

85

– रिपब्लिकन पक्षाचा इशारा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १९ :-  गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ५५० पेक्षा अधिक कंत्राटी शिक्षकांचे मार्च २०२५ पासूनचे थकलेले मानधन त्वरित अदा करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली असून, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. या वेळी कंत्राटी शिक्षकांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक दरमहा केवळ २० हजार रुपयांच्या अत्यल्प मानधनावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असून, दुर्गम भागात सेवा देत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडत आहेत. मात्र, मानधन वेळेवर न मिळाल्याने त्यांना गंभीर आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, अन्यायकारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मार्च महिन्यापासून थकीत असलेले मानधन तातडीने देण्यात यावे, मानधन दरमहा नियमितपणे अदा करण्यात यावे, कंत्राटी शिक्षकांना प्रवास भत्ता व आरोग्य सुविधा शासकीय निधीतून उपलब्ध करून द्याव्यात, तसेच गडचिरोली जिल्हा दुर्गम व भौगोलिकदृष्ट्या कठीण असल्याने शिक्षकांचे मासिक मानधन किमान १० हजार रुपयांनी वाढवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच मागील सत्रातील वाढीव पाच हजार रुपयांचे एरियर्स त्वरित देण्यात यावेत, असेही निवेदनात नमूद आहे.
या सर्व समस्यांची तातडीने सोडवणूक न झाल्यास अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते जगन जांभूळकर, सुखदेव वासनिक, जिल्हा संघटक हेमचंद्र सहारे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.