मुरूमगावात ७१ कार्डधारक धान्याविना ; पुरवठा विभाग झोपेत

246

मुरूमगावात ७१ कार्डधारक धान्याविना ; पुरवठा विभाग झोपेत

लोकवृत्त न्यूज
धानोरा, दि. ३० ऑगस्ट :- मुरूमगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्र. (१) मध्ये जुलै महिन्याचा धान्य वाटपाचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. एकूण १८६ कार्डधारकांपैकी केवळ ११५ कार्डधारकांनाच धान्य मिळाले असून, तब्बल ७१ कार्डधारकांना आजतागायत धान्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ऑगस्ट महिना संपत आला तरी जुलै महिन्याचे धान्य अद्याप मिळाले नसल्याने गोरगरीब जनतेत तीव्र संताप उसळला आहे.
याबाबत नागरिकांनी थेट पुरवठा निरीक्षक प्रशांत अंबादे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ उडवा-उडवीची उत्तरे मिळाली असून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अन्नपुरवठा विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, स्वस्त धान्य दुकानात कार्डधारकांनी धान्याची मागणी केली असता “ऑनलाईन मशीनमध्ये अडचण आहे” असे कारण देण्यात येत आहे. मात्र, जुलै महिन्याचा माल ३१ जुलैपर्यंत PSO मशीनद्वारे वाटप करणे आवश्यक होते. तरीसुद्धा ७१ कार्डधारक वंचित राहणे हे गंभीर दुर्लक्ष मानले जात आहे.
या प्रकरणी राज्य संघटनेमार्फत निवेदन सादर करून वंचित कार्डधारकांना तातडीने धान्य पुरवठा करावा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.