५ लाखांपासून ५ कोटींपर्यंत पुरस्कार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १६ :- ग्रामपंचायतींना अधिक सक्षम करून ग्रामीण भागात सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू होत आहे. या अभियानाचा गडचिरोली जिल्ह्यातील शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी गडचिरोली तालुक्यातील दिभना ग्रामपंचायतीत होणार असून, जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन ग्रामसभेत करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना आकर्षक रोख पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. ५ लाखांपासून ५ कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळणार असल्याने गावोगाव विकासाची शर्यत रंगणार आहे.
अभियानाचे उद्दिष्ट
१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे अभियान राबविले जाणार असून, ग्रामपंचायतींची कामगिरी आठ घटकांवर मोजली जाणार आहे. यात सुशासनयुक्त पंचायत, जलसमृद्धी व स्वच्छ-हरित गाव, मनरेगा व योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा समावेश आहे.
पुरस्कारांची रूपरेषा
ग्रामपंचायतींसाठी : प्रथम १५ लाख, द्वितीय १२ लाख, तृतीय ८ लाख, तसेच प्रत्येकी ५ लाखांचे दोन विशेष पुरस्कार
जिल्हास्तरीय : प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख, तृतीय २० लाख
विभागीय स्तरावर: प्रथम १ कोटी, द्वितीय ८० लाख, तृतीय ६० लाख
राज्यस्तरीय: प्रथम तब्बल ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, तृतीय २ कोटी
पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठीही स्वतंत्र विभागीय आणि राज्यस्तरीय कोटींचे बक्षिसे निश्चित करण्यात आली आहेत.
निवड प्रक्रिया
ग्रामपंचायतींनी केलेल्या स्वमूल्यांकन प्रस्तावांचे परीक्षण प्रथम तालुकास्तरीय समितीकडून केले जाईल. त्यानंतर जिल्हा, विभाग आणि अखेरीस राज्य स्तरावर विजयी संस्थांची निवड होईल. जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान ही मूल्यांकन प्रक्रिया पार पडेल.
गावोगाव सहभागाचे आवाहन
“या अभियानातून मिळणारी बक्षिसे ही प्रेरणादायी आहेत; परंतु खरी जिंक गावाच्या प्रगतीत आहे. म्हणून प्रत्येक ग्रामस्थाने सक्रिय सहभाग घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावावा,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
#gadchirolinews #lokvruttnews @Lokvrutt.com #gadchirolipolice #ProsperousVillage #SmartPanchayat #VillageDevelopment
#CleanGreenVillage #PanchayatiRajMission
#AwardForExcellence#RuralProgress
#PeopleParticipation#InclusiveGrowth
#TransformingVillages












