चकमकीत दोन महिला नक्षली ठार ;

431

१४ लाखांचे बक्षीस, ४५ गुन्ह्यांत सहभाग

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १७ :– गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगल परिसरात आज झालेल्या चकमकीत गट्टा दलमच्या दोन जहाल महिला नक्षली ठार पडल्या. पोलिसांच्या मते, ठार झालेल्या दोन्ही महिला माओवादी वरिष्ठ दर्जाच्या असून त्यांच्यावर मिळून तब्बल १४ लाखांचे बक्षीस जाहीर होते.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखालील सी-६० कमांडो व सीआरपीएफ १९१ बटालियनच्या ई कंपनीने संयुक्तरीत्या राबविली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जंगल परिसराला घेराबंदी करण्यात आली असता दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर अंधाधुंध गोळीबार सुरू केला. पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले, मात्र नक्षलींनी हल्ला अधिक तीव्र केल्याने जवानांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. यात दोन महिला नक्षली जागीच ठार झाल्या.
ठार झालेल्या नक्षलींची ओळख पटली असून त्यामध्ये सुमित्रा ऊर्फ सुनिता वेलादी (३८), रा. मडवेली, ता. अहेरी, जि. गडचिरोली. गट्टा दलम कमांडर. तिच्यावर ८ लाखांचे बक्षीस होते. १४ चकमकी, १२ खून, ३ जाळपोळ आणि इतर गंभीर गुन्ह्यांसह एकूण ३१ गुन्ह्यांत ती सामील होती.
ललिता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा (३४), रा. नेलटोला, ता. पाखांजूर, जि. कांकेर (छ.ग.). गट्टा दलम एसीएम. तिच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते. ८ चकमकी, ४ खून, १ जाळपोळ व अन्य १४ गुन्ह्यांत ती सामील होती. ती डिव्हीसीएम राजु वेलादी ऊर्फ कलमसाय याची पत्नी होती.
घटनास्थळावरून ए.के. ४७ रायफल, पिस्तूल, ३७ जिवंत काडतुसे, वॉकी-टॉकी आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या संपूर्ण कारवाईत दाखविलेल्या सी-६० व सीआरपीएफ जवानांच्या शौर्याचे कौतुक केले. तसेच, जिल्ह्यातील माओवादविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. “नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण करावे आणि मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
#Lokvruttnews @Lokvrutt.com #lokvruttnews
#gadchirolipolice #NaxalEncounter #MaoistInsurgency #CRPF #C60Commandos #RewardedMaoists #AntiNaxalOperation #SecurityForces