गडचिरोलीच्या प्रवेशद्वारावर खड्डे, धूळ आणि दुर्गंधीचा साम्राज्य : राष्ट्रीय महामार्ग आहे की पांदण रस्ता?

159

– मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीचे थातूरमातूर डांबरीकरण, पहिल्याच पावसात उघडं पडलं

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : स्टील हबच्या दिशेने वाटचाल करणारं गडचिरोली जिल्हा आजही रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे बदनाम ठरत आहे. नागपूरवरून गडचिरोलीत प्रवेश करताच जिल्हा मुख्यालयाजवळील आरमोरी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, उडणारी धूळ आणि दुर्गंधी नागरिकांचे स्वागत करत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
गडचिरोली शहरातील मुख्य चौकापासून सुमारे दोन किलोमीटरपर्यंतचा रस्ता अक्षरशः चाळण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी थातूरमातूर डांबरीकरण करून जनतेची दिशाभूल करण्यात आली. परंतु, पहिल्याच पावसात या रस्त्याचे खड्डेमय रूप जैसे थे झाले. आता खड्ड्यांमध्ये मातीमिश्रीत गिट्टी टाकून संबंधित विभाग ‘वेळ मारून नेत’ असल्याचे नागरिकांचे आरोप आहेत. परिणामी, वाहनधारकांना खड्डे आणि प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे.
दररोज शेकडो नागरिक, शाळकरी विद्यार्थी तसेच नागपूरवरून येणारे प्रवासी या मार्गाने गडचिरोली शहरात दाखल होतात. मात्र जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरच त्यांना खड्डे, धूळ व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. “स्टील हबची स्वप्नं दाखवणाऱ्या जिल्ह्यात असा खड्डेमय रस्ता असेल, तर यापेक्षा दुर्दैव कोणते?” असा जळजळीत सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरच दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रवाह

नगरपरिषद प्रशासन स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दावे करते. खाजगी कंत्राटदाराच्या मदतीने कामही सुरू असल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात गडचिरोलीच्या प्रवेशद्वारावरच हे सर्व दावे फोल ठरत आहेत. आरमोरी रोड परिसरातील अस्वच्छतेमुळे शहरातील घाणेरडे पाणी थेट राष्ट्रीय महामार्गावर वाहताना दिसते.
या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही स्वच्छता मोहीम किंवा कायमस्वरूपी उपाययोजना राबवली गेली नाही. परिणामी, वाहनचालक, दुकानदार आणि प्रवाशांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्याला स्टील हबचे भविष्य दाखवले जात असताना, प्रवेशद्वारावरील खड्डेमय रस्ते आणि वाहणारे घाणपाणी ही गडचिरोलीची खरी ओळख ठरत आहे.

@lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews #gadchirolipolice #RoadSafety #Accident #Gadchiroli #ArmoriRoad #Potholes #PublicWorks #Administration #Maharashtra #गडचिरोली #आरमोरीमार्ग #खड्डे #अपघात #खड्डेमुक्ती #जिल्हाधिकारी #सार्वजनिकबांधकाम #महाराष्ट्र #लोकवृत्त