– गडचिरोली-चंद्रपूर संयुक्त आढावा बैठकीत उत्साहाचा जल्लोष
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र समितीचे राज्याध्यक्ष महेश सरणीकर यांच्या विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने गडचिरोली येथे गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांची संयुक्त आढावा बैठक उत्साहात व भव्यदिव्य वातावरणात पार पडली.
बैठकीस दोन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी, तालुका प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगमनानंतर राज्याध्यक्षांचा पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन मान्यवरांनी जंगी सत्कार केला. स्वागत सोहळ्याने सभागृहात उत्साह आणि एकात्मतेची लहर निर्माण केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वतः राज्याध्यक्ष महेश सरणीकर यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ संघटक सौ. ज्योत्स्ना करवडे व गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष अजय पाटील यांनी प्रभावीपणे केले.
आपल्या प्रेरणादायी भाषणात राज्याध्यक्ष सरणीकर यांनी समितीचे उद्दिष्ट स्पष्ट करताना माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र समिती या त्रिसूत्रीवर सखोल विवेचन केले. “न्याय, पारदर्शकता व उत्तरदायित्व समाजात दृढ करण्यासाठी सक्षम नेतृत्व घडविणे आणि सशक्त संघटना उभारणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
बैठकीदरम्यान गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल शाल-श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तर अजय पाटील यांची पदोन्नती करून त्यांना चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. याशिवाय समाजहितासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये रोशन कवाडकर (जिल्हा सचिव), सुरज गुंडमवार (जिल्हा उपाध्यक्ष, गडचिरोली), कमलेश बोरूले (शहर अध्यक्ष), सौ. अनुपमा रॉय (तालुका महिला अध्यक्षा, चार्मोशी), सौ. गोपिका धुर्वे (तालुका महिला कार्यकारिणी सदस्या, चार्मोशी) आदींचा समावेश होता.
या आढावा बैठकीत उत्स्फूर्त सहभागातून समितीच्या एकात्मतेची जाणीव झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नव्याने नियुक्त झालेले चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अजय पाटील यांनी केले. अखेरीस जय्यत उत्साह व एकतेच्या वातावरणात बैठकीची सांगता झाली.










