– निष्काळजीपणामुळे चुटूगुंटा परिसरात तणाव
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :– गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील चुटूगुंटा गावात लाॅयट्स मेटल्स एनर्जी लिमिटेडच्या वाहनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव गेला. दशरथ सिताराम आत्राम (वय ५०) या शेतकऱ्याला कंपनीचा रस्ता लेव्हल करण्यासाठी वापरला जाणारा ग्रेडर मशीन बेफाम वेगात धडकला. अपघात इतका भीषण होता की आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, सुरजागड टेकड्यांवरील लोहखनिज वाहतुकीसाठी वापरली जाणारी कंपनीची वाहने अक्षरशः सुसाट धावत असून त्यांच्यावर कुठल्याही सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली. “कंपनीने संपूर्ण रस्ता आपलाच समजून घेतला आहे. निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या अपघातानंतर दलालामार्फत पीडित कुटुंबास फक्त दहा लाख रुपयांचा मोबदला देण्याची ऑफर दिल्याचे समोर आले. “यापेक्षा जास्त मागणी केली तर काय करायचं ते करून घ्या,” अशी उघड धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी केला.
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात सामान्य शेतकऱ्याच्या मृत्यूची किंमत फक्त दहा लाख ठरवली जात असल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. “कंपनीच्या वाहनांवर नियंत्रण नसल्याने नागरिकांना रस्त्यावर चालण्याच्याही स्वातंत्र्यावर गदा येईल की काय?” अशी भीती लोकांच्या मनात घर करून बसली आहे.













