192 बटालियनच्या पुढाकाराने गडचिरोली बसस्थानक झळाळले
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : “स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत आज गडचिरोली शहरातील सरकारी बसस्थानक परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 192 बटालियनचे कमांडंट परविंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या एका तासात घेतलेल्या या मोहिमेत जवानांसोबतच नागरिक, विद्यार्थी आणि विभागीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या उपक्रमात 192 बटालियनचे जवान, बसस्थानक व्यवस्थापक सौ. पूजा सहारे, परिवहन विभागाचे कर्मचारी, सफाई मित्र, स्थानिक शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. सर्वांनी मिळून बसस्थानक व परिसर स्वच्छ, आकर्षक आणि सुव्यवस्थित केला.
आयोजकांच्या मते, या मोहिमेचा उद्देश फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून प्रत्येक नागरिकामध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे हा आहे. “स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून जीवनाचा अविभाज्य भाग आहे,” असे त्यांनी सांगितले.
आजचा दिवस गडचिरोलीकरांसाठी प्रेरणादायी ठरला असून, “एकजुटीने मोठे बदल घडवता येतात” हे सिद्ध झाले. नागरिकांनी आपापल्या जीवनशैलीत स्वच्छतेची सवय अंगीकारल्यास अशा मोहिमा हळूहळू अनावश्यक ठरतील. या मोहिमेने शहराला स्वच्छतेचा संदेश दिला आणि जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.










