गडचिरोली: प्रसूतीनंतर रक्तस्त्रावामुळे तरुण महिलेस मृत्यू
लोकवृत्त न्यूज
धानोरा, दि. ७ :- प्रसूतीनंतर प्रकृती बिघडल्याने उपचारादरम्यान तरुण महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, याबाबत धानोरा पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक सौ. माधुरी गणेश नैताम (वय २५, रा. चिखली, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली) हिला दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.०० वाजता प्रसुतीनंतर रक्तस्त्राव होऊ लागल्याने प्रकृती खालावली. तत्काळ तिला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दिनांक १७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता हलविण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान २५ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता माधुरी नैताम हिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. रायपूरेंनी पोलिसांना दिली.
या संदर्भात डॉ. अमोल चवरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन धानोरा येथे मर्ग क्र. ४२/२०२५ कलम १९४ बी.एन.एस.एस. २०२३ अन्वये नोंद घेण्यात आली आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कोमल वांढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, सफौ. बारीकराव हे तपास अमलदार म्हणून कार्यरत आहेत.
#Gadchiroli #Dhanora #MaternalDeath #PoliceInquiry #lokvruttnews @lokvrutt.com













