दिवाळीच्या शुभेच्छांआड राजकीय तापमान चढले ; नवख्या चेहऱ्यांचा बॅनरबाजार

345

– जुन्या उमेदवारांचे गणित बिघडले

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- नगर परिषद निवडणुकीची चाहूल लागताच शहरात ‘बॅनर युद्धा’ला उधाण आले आहे. दिवाळीच्या शुभेच्छांच्या नावाखाली नवखे युवक राजकीय पाय रोवण्याचा प्रयत्न करत असून, नागरिकांमध्ये त्यांच्या या स्व-प्रसार मोहिमेची जोरदार चर्चा रंगली आहे.

दिवाळीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रभागाचे नाव नमूद करून शुभेच्छा बॅनर लावले गेले असून, त्यावर उमेदवारासारखे पोझ देणारे फोटो पाहून जनतेत विनोदाचा विषय निर्माण झाला आहे. काही नवखे चेहरे जणू पक्षाचे तिकीट मिळाल्याचा आभास निर्माण करत स्वतःचा प्रचार रंगवत आहेत. तर काहींनी मिठाई वाटताना डब्यावर आपले फोटो व संदेश छापून ‘लोकसंपर्क अभियान’ सुरू केले आहे.

दरम्यान, प्रभाग रचना पूर्ण होऊन नवे आरक्षण जाहीर झाल्याने अनेक जुन्या उमेदवारांना यंदा आपल्या जुन्या प्रभागातून उमेदवारी मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे नवे प्रभाग, नवे चेहरे आणि नवी समीकरणे या निवडणुकीत दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, शहरातील प्रत्येक चौकात लटकणारे बॅनर हेच आता या नवोदितांच्या महत्त्वाकांक्षेचे आणि आगामी नगर परिषद निवडणुकीच्या राजकीय तापमानाचे प्रतीक ठरत आहेत.

#lokvruttnews @lokvrutt.com
#MunicipalElections2025 #PoliticalBannerWar #GadchiroliPolitics #NewWardReservation #YouthInPolitics