– चौकशीची मागणी, अन्यथा ‘फलक निदर्शन’चा इशारा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १ :- गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा आणि आरमोरी तालुक्यातील शासकीय वाळू डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप करत सुरज हजारे यांनी संबंधित डेपोधारक व तहसीलदार यांच्यावर तात्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हजारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, धानोरा तालुक्यातील दुधमाळा वाळू डेपो आणि आरमोरी तालुक्यातील देऊळगाव वाळू डेपो येथे प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या वाळू साठ्यापेक्षा कमी साठा दाखवून शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रकार घडला आहे. यावरील पंचनामा व गुन्हेनोंद तहसीलदारांनी तात्काळ करणे अपेक्षित असतांना, त्यांनी संबंधित डेपोधारकांना सहकार्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अर्जदाराने केली असून, “जर पुढील सात दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘फलक निदर्शन’ आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
या तक्रारीवर जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रानु खा. शेख यांनी “धानोरा व आरमोरी तालुक्यातील शासकीय डेपोतील अनियमिततेची तक्रार प्राप्त झाली असून, चौकशी समिती नेमून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी,” अशा पत्र उपविभागीय अधिकारी गडचिरोली/देसाईगंज यांना दिल्या आहेत.
दरम्यान, या तक्रारीनंतर स्थानिक प्रशासनातही हलचल निर्माण झाली असून, वाळू डेपो व्यवस्थापनात पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
@Lokvrutt.com #lokvruttnews #Gadachirolinews
#Gadchiroli #SandDepot #Corruption #Investigation #PublicComplaint #GovernmentAction #रेती













