अबब….गोंडवाना विद्यापीठ परिसरात बिबट्याचा वावर

402

विद्यार्थ्यांना सतर्कतेचा इशारा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, : गोंडवाना विद्यापीठाच्या एम.आय.डी.सी. रोड कॉम्प्लेक्स परिसरात हिंस्त्र प्राणी बिबट्याचा वावर आढळल्याने विद्यापीठ प्रशासनाने सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांनी सायंकाळी ८.३० नंतर वसतिगृहाबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, विद्यापीठ परिसरात कोणताही हिंस्त्र प्राणी दिसल्यास तात्काळ जवळच्या सुरक्षा रक्षकाला माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रशासनाने पुढे म्हटले आहे की, परिसरात शिळे किंवा उर्वरित अन्न टाकू नये, कारण त्यामुळे वन्य प्राणी आकर्षित होण्याचा धोका वाढतो. सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी दक्षता पाळावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने परिसरातील सुरक्षेची उपाययोजना वाढवली असून, वनविभागालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये मात्र बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.