गडचिरोलीत महिला सक्षमीकरणाला नवे बळ : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते माविमच्या महिला बचत गटांना फिरता निधी वितरण

246

– ३ कोटी रुपयांचा निधी, प्रत्येक गटाला १ लाख – २१० महिलांनी यशस्वीपणे उभारले व्यवसाय मॉडेल

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ८ :- गडचिरोली जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला नवे बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते माविमच्या महिला बचत गटांना रु. ३ कोटींच्या फिरत्या निधीचे वितरण आज अहेरी येथे करण्यात आले. या निधीमुळे जिल्ह्यातील हजारो महिलांच्या उद्यमशीलतेला नवे पंख मिळणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत ‘महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)’ ही महिला सक्षमीकरणाची प्रमुख शासकीय संस्था असून, ती २० जानेवारी २००३ रोजी राज्य शासनाने ‘महिला विकासाची शिखर संस्था’ म्हणून घोषित केली आहे. माविमच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४१९ गावांतील ३०६१ महिला बचत गटांद्वारे ३४,८९५ महिला संघटितपणे कार्यरत आहेत.
या बचत गटांच्या माध्यमातून दूध संकलन केंद्र, वनउपज प्रक्रिया, हळद लागवड, पशुखाद्य निर्मिती, हातसडी तांदूळ उत्पादन, कुक्कुटपालन, मोहलाडू निर्मिती, जांभूळ प्रक्रिया युनिट असे विविध उपक्रम यशस्वीपणे सुरू आहेत. तसेच पोहा निर्मिती व बारदाना उत्पादन यांसारखे नवे प्रकल्पही सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहेत. जिल्ह्यात बचत गटांना विक्रीसाठी १०३ विक्री केंद्रे देण्यात आली आहेत.
सन २०२३-२४ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतील महिलांसाठी राखीव ३ टक्के निधीतून १.५० कोटी रुपयांचा फिरता निधी देण्यात आला होता. या निधीतून १५० महिलांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मिळाले. उद्यमशील महिलांनी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून निधीची परतफेड करून आणखी ६० महिलांना आर्थिक मदत दिली. अशा प्रकारे एकूण २१० महिला उद्योजिकांनी विविध क्षेत्रात उद्योग उभारून यशस्वी परतफेडीचे आदर्श उदाहरण घडवले आहे.
या योजनेच्या यशस्वीतेचा विचार करून सन २०२५-२६ मध्ये ३ कोटी रुपयांचा नवीन फिरता निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक महिला बचत गटाला १ लाख रुपये निधी वितरित केला जाणार आहे. या निधी वितरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहेरी तालुक्यातील बिरसामुंडा महिला बचत गट आणि राजाराम महिला बचत गटांना धनादेश प्रदान करून करण्यात आला.
या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला असून, ग्रामीण भागातील महिला आता उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन क्षेत्रात सक्षम उद्योजिका म्हणून उदयास येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या श्रमसिद्ध प्रयत्नांना शासनाच्या सहकार्याची जोड मिळाल्याने ‘गडचिरोली मॉडेल’ हे राज्यातील महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.