अतिवृष्टी, रेल्वे प्रकल्पात गेलेली शेती ठरली का कारणीभूत?
लोकवृत्त न्यूज
आरमोरी, दि. १३ नोव्हेंबर : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी गावात आज सकाळी एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. गजानन नामदेव लाकडे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते दीर्घकाळ शेती व्यवसाय करीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लाकडे यांच्या काही शेतीवरून रेल्वे प्रकल्प गेल्याने त्यांना आर्थिक फटका बसला होता. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून तीव्र नैराश्यात होते, अशी चर्चा परिसरात आहे. आज सकाळी त्यांनी स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
दिवंगत लाकडे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र पोलिस तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेने इंजेवारी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिक शेतकरी वर्गातून होत आहे.










