स्वच्छ व सुरक्षित अन्नविक्रीसाठी गडचिरोलीत FoSTaC मोहीम; प्रशिक्षक, अधिकारी व अन्न विक्रेते एकत्र

170

स्वच्छ व सुरक्षित अन्नविक्रीसाठी गडचिरोलीत FoSTaC मोहीम; प्रशिक्षक, अधिकारी व अन्न विक्रेते एकत्र

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : गडचिरोली शहरातील रस्त्यांवर तसेच विविध दुकानांमध्ये अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली आणि FoSTaC संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात संविधान दिनानिमित्त सर्व उपस्थितांनी संविधानाची शपथ घेऊन केली. शहरातील 150 हून अधिक फूड विक्रेत्यांनी उत्साहाने प्रशिक्षणात सहभाग नोंदवला.
सोप्या व खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षण: FoSTaC चे अधिकृत प्रशिक्षक गुरुनाथ सावंत यांनी फूड सेफ्टीचे नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि आवश्यक खबरदारी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत सांगितली. प्रशिक्षण खेळीमेळीच्या वातावरणात झाल्यामुळे विक्रेत्यांनी माहिती सहज आत्मसात केली आणि व्यवसायात अमल करण्याचा आत्मविश्वास मिळाला.
अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांनी कायदा व नियमांचे उल्लंघन झाल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईसंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी जितेंद्र कुंजम यांनी व्यवसायात पाळावयाच्या मूलभूत अटींबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी हॉटेल असोसिएशन गडचिरोलीचे अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे यांनी उपस्थित विक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून ग्राहकांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन सहायक नमुना अधिकारी मारोती गोडे आणि मदन चावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले, तसेच सहकारी अधिकारी व स्थानिक प्रशासनाचे सहकार्य लाभले. यावेळी श्री कृष्णा जयपूरकर, सह आयुक्त, नागपूर विभाग आणि श्री नीलेश थातोड, सहायक आयुक्त, गडचिरोली यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले.

प्रमाणपत्र व सुरक्षा किटचे वितरण

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना FSSAI – FoSTaC Food Safety Training and Certificate of Competence प्रदान करण्यात आले. यासोबत विक्रेत्यांना FoSTaC सुरक्षा किटही दिले गेले, ज्यामध्ये 2 एप्रॉन, 3 छोटे नॅपकिन, 1 टोपी/पाकीट हेअर कॅप आणि “I Serve Safe Food – I Follow the Golden Rules” पोस्टर यांचा समावेश होता. उपस्थितांनी 12 अन्न सुरक्षा गोल्डन रुल्सची शपथ देखील घेतली.
मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थित विक्रेत्यांनी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले आणि यामुळे त्यांच्या व्यवसायातील स्वच्छता, सुरक्षितता व शिस्त वाढण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.