क्षणात घराची झाली राख : फ्रिजचा स्फोट, सिलिंडरचा भडका- गडचिरोली हादरली

1725

क्षणात घराची झाली राख : फ्रिजचा स्फोट, सिलिंडरचा भडका- गडचिरोली हादरली

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १३ : एका क्षणात सुखाचा संसार राखेत मिसळला. घरातील फ्रिजमध्ये किरकोळ बिघाड झाल्यानंतर दुरुस्तीसाठी मेकॅनिकला पाचारण करण्यात आले होते. मात्र मेकॅनिक घराकडे येत असतानाच अचानक फ्रिजचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाने बाजूलाच असलेल्या गॅस सिलिंडरलाही कवेत घेतल्याने प्रचंड भडका उडाला आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण घर बेचिराख झाले. ही अंगावर शहारे आणणारी घटना आज शनिवार, १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातील गोकुलनगर परिसरात, नगरपरिषदेच्या सावित्रीबाई फुले शाळेसमोर असलेल्या माया सचिन भानारकर यांच्या निवासस्थानी घडली.
प्राप्त माहितीनुसार, भानारकर यांच्या घरातील फ्रिजमधील दिवा सतत उघडझाप करत होता. फ्रिजमध्ये तांत्रिक बिघाड असावा, असा संशय आल्याने कुटुंबीयांनी फ्रिज दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकला तात्काळ संपर्क साधून येण्यास सांगितले होते. दरम्यान मेकॅनिक निघालेला असतानाच, कोणताही पूर्वसंकेत न देता फ्रिजचा अचानक स्फोट झाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
स्फोट होताच घरातील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. मात्र फ्रिजच्या स्फोटाने बाजूला ठेवलेला गॅस सिलिंडरही पेटून त्याचाही जोरदार स्फोट झाला. परिणामी आगीची तीव्रता इतकी वाढली की घरातील फर्निचर, कपडे, धान्य, विद्युत उपकरणे तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. स्फोटाच्या तीव्रतेमुळे छतावरील कवेलू तुटून पडल्या आणि घराला मोठी हानी झाली.
घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यानंतर गडचिरोली पोलिसांनीही घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेप्रकरणी वृत्त लिहीपर्यंत गडचिरोली पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

४० हजार रोख व दागिने जळाले

घरमालकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात ठेवलेले सुमारे ४० हजार रुपये रोख तसेच सोन्या-चांदीचे दागिने आगीत जळून खाक झाले. फ्रिज व गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने भानारकर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले असून, सध्या हे कुटुंब उघड्यावर आले आहे.