तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

593

– सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान परिसरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या आरोपीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

रणजितसिंग चंदनसिंग टाक (वय ५१, रा. पेठतुकूम, देऊळगाव, ता. आरमोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १०) पीडिता आपल्या मित्रासोबत सेमाना देवस्थान परिसरात फिरण्यासाठी गेली असता आरोपी तेथे आला. त्याने दोघांना धमकावत तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला.

घटनेनंतर पीडिता व तिच्या मित्राने तात्काळ गडचिरोली पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून गुरुवारी आरोपीला अटक केली. शुक्रवारी (दि. १२) आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत.