गडचिरोली : वेतनवाढीसाठी लैंगिक छळ करणारा आरोपी तालुका वैद्यकीय अधिकारी नागपुरात मोकाट असल्याची चर्चा

1292

गडचिरोली : वेतनवाढीसाठी लैंगिक छळ करणारा आरोपी तालुका वैद्यकीय अधिकारी नागपुरात मोकाट असल्याची चर्चा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : वेतनवाढीचे आमिष दाखवत कंत्राटी महिला आरोग्य सेविकेचा दीर्घकाळ लैंगिक व मानसिक छळ करणारा आरोपी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री (वय ५०) अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून, तो नागपुरात मोकाट फिरत असल्याची जोरदार चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे. या प्रकारामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरली असून पोलिस व प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुलचेरा येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी महिला आरोग्य सेविकेने सततच्या छळाला कंटाळून ६ डिसेंबर २०२५ रोजी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रकृती गंभीर झाल्याने तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी डॉ. म्हशाखेत्री यांनी मागील दोन वर्षांपासून वेतनवाढीचे आमिष दाखवत शारीरिक संबंधांची मागणी केली. पदाचा गैरवापर करून करण्यात आलेल्या या अमानुष वर्तनामुळे पीडितेवर तीव्र मानसिक ताण आला होता. वारंवार होणाऱ्या अपमान, दबाव आणि धमक्यांमुळे अखेर तिने टोकाचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप आहे.
या प्रकरणी ८ डिसेंबर २०२५ रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५(२) व ७८(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास मुलचेरा पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोपी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केले आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने व विभागीय चौकशी प्रस्तावित असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत डॉ. म्हशाखेत्री यांचे निलंबन करण्यात आले असून, निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे.
मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपी नागपुरात लपून असल्याची चर्चा असून, अधिवेशन काळात तो नागपुरात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती चर्चेत आहे.
या प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडितेला संपूर्ण न्याय मिळावा, अशी ठाम मागणी आरोग्य कर्मचारी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

#Lokvruttnews @lokvrutt.com #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Mulchera #HealthWorker #ContractStaff #Sexual Harassment #WagePromise #SuicideAttempt #PoisonConsumption #ZeroFIR #Indian Penal Code #Policeinvestigation #MedicalOfficer #BreakingNews #LocalNews #GadchiroliNews