गडचिरोली : राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली मुरूमची खुलेआम लूट, ग्रामस्थांमुळे कारवाई

286

 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : लगाम–आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या नावाखाली वांगेपल्ली येथील गिट्टी खदानातून अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अवैध वाहतुकीची माहिती महागाव येथील नागरिकांना मिळताच ग्रामस्थांनी सतर्कतेने पावले उचलत अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रक गावातच अडवले.

ग्रामस्थांनी ट्रक चालकांकडे वाहतूक परवान्याची मागणी केली असता कोणताही वैध परवाना उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तातडीने तहसीलदारांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. महसूल प्रशासनाच्या उपस्थितीत त्या क्षेत्रातील मंडळ अधिकाऱ्यांनी मोकापंचनामा करून अवैध मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले.

महत्त्वाचे म्हणजे, मागील काही दिवसांपासून या परिसरात अशाच प्रकारे अवैध मुरूम वाहतूक सुरू असल्याबाबत ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला वारंवार अवगत केले होते. मात्र, वेळेत ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. अखेर ग्रामस्थांनी एकत्र येत थेट हस्तक्षेप केल्यानंतरच प्रशासनाला हालचाल करावी लागली, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

घरकुलधारकांनी घर बांधकामासाठी एक ब्रास वाळू आणली तरी महसूल विभाग तात्काळ कारवाई करतो; मात्र लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईसाठी प्रशासनाकडून हयगय का? असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

अवैध मुरूम वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था, धूळप्रदूषण आणि अपघाताचा धोका वाढल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीने आतापर्यंत केलेल्या मुरूम उत्खननाची तांत्रिक चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच शासनाचा महसूल बुडवणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.