गडचिरोली : अतिदुर्गम तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत पोलीस स्टेशन कार्यान्वित

368

गडचिरोली : अतिदुर्गम तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत पोलीस स्टेशन कार्यान्वित

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १९ : जिल्ह्यात माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील व अति-दुर्गम भागात सुरक्षेला बळ देण्यासाठी तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत नवीन पोलीस स्टेशन उभारण्यात आले. १९ डिसेंबर २०२५ रोजी हे पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात आले असून, या उपक्रमामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह विकासाला गती मिळणार आहे.
उपविभाग हेडरी अंतर्गत येणारे तुमरकोठी हे ठिकाण पोस्टे कोठीपासून ७ किमी तर छत्तीसगड सिमेपासून केवळ २ किमी अंतरावर आहे. २०२३ पासून सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठी सुरू असलेल्या साखळीतील हे ९वे नवीन पोलीस स्टेशन ठरले आहे. या उभारणीसाठी १००० सी-६० कमांडो, २१ बीडीडीएस पथके, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदारांसह सुमारे १०५० मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.
४ जेसीबी, २ पोकलेन, ७ ट्रेलर व २५ ट्रकच्या सहाय्याने एका दिवसात संपूर्ण पोलीस स्टेशन उभे करण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये १२ पोर्टा कॅबिन, वायफाय सुविधा, जनरेटर शेड, आरओ पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाईल टॉवर, स्वच्छतागृहे, मॅक वॉल, बी.पी. मोर्चा व सँड मोर्चा उभारण्यात आले आहेत.
पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी २ अधिकारी व ५२ अंमलदार, एसआरपीएफ, सीआरपीएफ १९१ बटालियनचे पथक तसेच विशेष अभियान पथक तैनात करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ कमांडंट सत्य प्रकाश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी जनजागरण मेळावा घेण्यात आला. यामध्ये महिलांना साड्या, पुरुषांना ब्लॅंकेट व घमेले, युवकांना कपडे व शैक्षणिक साहित्य, तर मुलांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्यात या अति-दुर्गम भागात रस्ते बांधकाम व एस.टी. बस सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
नवीन पोलीस स्टेशनची उभारणी ही या भागातील सुरक्षा बळकट करून नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.