जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य प्रयोगशाळेचे लोकार्पण

191

– रोगनिदान व सार्वजनिक आरोग्य देखरेख अधिक सक्षम; दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार तपासणीची मोठी सुविधा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ९ : जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे नवनिर्मित एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे (इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी) गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे रोगनिदान, आजारांची देखरेख तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मोठे बळ मिळणार आहे.
या प्रयोगशाळेत संसर्गजन्य आजारांची तपासणी, पाणी व अन्ननमुने विश्लेषण, पर्यावरणीय नमुन्यांची चाचणी तसेच विविध जैविक तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामुळे आजारांचे लवकर व अचूक निदान होऊन वेळेत उपचार सुरू करणे शक्य होणार असून संभाव्य साथरोगांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस. लहाडे यांनी ही प्रयोगशाळा राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा नेटवर्क अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाची पायरी असल्याचे सांगितले. या सुविधेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही दर्जेदार, विश्वसनीय व अचूक तपासणी सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोलीचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे तसेच वरिष्ठ प्राध्यापक डॉ. नितीन टिपले उपस्थित होते. यावेळी सामान्य रुग्णालयातील डॉ. सचिन करंजेकर (शरीरविकृती शास्त्रज्ञ, वर्ग–१), डॉ. मुकुंद ढबाले (शरीरविकृती शास्त्रज्ञ) यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी, वेगवान व लोकाभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त केला.