दुचाकींच्या समोरासमोर भीषण धडक ; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

296

दुचाकींच्या समोरासमोर भीषण धडक ; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

लोकवृत्त न्यूज
एटापल्ली, दि. १० :- एटापल्ली–गुरुपल्ली मार्गावर गुरुपल्ली गावाजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही दुचाकी अक्षरशः चकनाचूर झाल्या.
प्राप्त माहितीनुसार, एटापल्ली येथून मजुरीचे काम आटोपून आलापल्लीकडे जात असलेले रमेश धर्मा मडावी (रा. नलिकोण्डा, तेलंगणा राज्य) हे आपल्या सहकारी विलास भगवान टेकाम यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होते. याचवेळी करपनफुडी (ता. एटापल्ली) येथील सोमजी मडावी हे समोरून दुचाकीवरून येत असताना दोन्ही वाहनांची जोरदार समोरासमोर धडक झाली.
या भीषण धडकेत रमेश धर्मा मडावी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात विलास भगवान टेकाम व सोमजी मडावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच एटापल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतल्या असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, एटापल्ली–गुरुपल्ली मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन, रस्त्याची खराब अवस्था व वाहतूक सुरक्षेअभावी अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र चर्चा आहे. या मार्गावर तातडीने वेगनियंत्रण, सूचना फलक व सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.