गडचिरोली : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने टेम्पोला धडक देत केला पोबारा, गावकऱ्यांनी पाठलाग करून ट्रक पकडला

512

 – एक जखमी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १५ :- गडचिरोलीजवळील येवली येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वेगवान ट्रकने टेम्पोला जबर धडक देऊन अपघात घडवला. मात्र अपघातानंतर थांबण्याऐवजी ट्रकचालकाने ट्रकसह पोबारा केला. ही घटना आज बुधवार, १५ जानेवारी रोजी घडली. अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोलीकडून येणारी ‘छोटा हत्ती’ टेम्पो (क्रमांक एमएस ३३ टी ४९६१) येवली परिसरात असताना समोरून येणाऱ्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने (क्रमांक सीजी ०८ एएस ५२२२) तिला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोचालक राजू सोनटक्के हे किरकोळ जखमी झाले.
अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळी न थांबता भरधाव वेगाने पळ काढला. मात्र संतप्त गावकऱ्यांनी तत्काळ पाठलाग करत डोंगरगाव परिसरात संबंधित ट्रक पकडला. त्यावेळी ट्रकचालकाने ट्रक सोडून पळ काढल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, येवली–डोंगरगाव मार्गावर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून, वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. यापूर्वीही या मार्गावर गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आजच्या अपघातामुळे पुन्हा एकदा लोहखनिज वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.