ट्रॅक्टरवरील कारवाई टाळण्यासाठी लाच घेताना क्षेत्र सहायक एसीबीच्या जाळ्यात

265

ट्रॅक्टरवरील कारवाई टाळण्यासाठी लाच घेताना क्षेत्र सहायक एसीबीच्या जाळ्यात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : वनजमिनीवर अवैध काम केल्याचा आरोप करून जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरवरील दंड कमी करण्यासाठी लाच मागणाऱ्या सिरोंचा वन विभागातील क्षेत्र सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गडचिरोली पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई बुधवारी २१ जानेवारी कमलापुर वनपरिक्षेत्राअंतर्गत राजाराम (खां) उपक्षेत्रात करण्यात आली.
महेश जयंतराव धामनगे (वय ४७), क्षेत्र सहाय्यक, सिरोंचा वन विभाग असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध राजाराम (खां) उपपोस्ट येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार तेलंगणा राज्यातील असून तो काकांच्या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांच्या शेतीची मशागत करत होता. दरम्यान, दोन वनरक्षकांनी ‘वनजमिनीवर अवैध काम’ केल्याचा आरोप करत ट्रॅक्टर जप्त केला. त्यानंतर क्षेत्र सहाय्यक महेश धामनगे यांनी संपर्क साधून गुन्हा दाखल न करता व दंड कमी करून तडजोड करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. अखेर १० हजार रुपयांत व्यवहार ठरवण्यात आला.
याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक विक्रांत सगणे यांच्या नेतृत्वाखाली पंचांसह सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना महेश धामनगे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर राजाराम (खां) व चंद्रपूर येथील त्याच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली.
सदर कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नक्षलप्रभावित भागात झालेल्या या धडक कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे.