लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; तीन तरुण जखमी

202

आष्टीजवळ चौडमपल्ली येथे भीषण अपघात, ट्रक चालक फरार

लोकवृत्त न्यूज
आष्टी : लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या एका वेगवान ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन तरुण जखमी झाल्याची घटना आष्टीजवळील चौडमपल्ली गावाच्या परिसरात घडली. या अपघातात दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या पायांना फ्रॅक्चर झाले आहे. हा अपघात गुरुवारी (दि. २२) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील रहिवासी असलेले तेजसिंग राजपूत (२२), दीपक राजपूत (२४) आणि अशोक राजपूत (२३) हे तिघे सध्या गडचिरोली जिल्ह्यातील गुंडापल्ली येथे वास्तव्य करून लादी (टाइल्स) बसवण्याचे काम करीत होते. गुरुवारी सकाळी हे तिघे भाऊ एकाच दुचाकीने गुंडापल्ली येथून धनूरकडे कामासाठी निघाले होते. दरम्यान चौडमपल्ली गावाजवळ आलापल्लीकडून भरधाव वेगात येणाऱ्या लोहखनिज वाहक ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर भीषण धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी होती की तिघेही तरुण रस्त्यावर दूरवर फेकले गेले. अपघातानंतर ट्रक चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, जखमी तरुणांचा तिसरा भाऊ योगायोगाने मागून दुसऱ्या वाहनाने येत होता. अपघात झाल्याचे लक्षात येताच त्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिन्ही जखमींना तातडीने आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तेजसिंग व दीपक यांच्या पायांना गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर अशोक याच्यावर आष्टी येथे उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फरार लोहखनिज वाहक ट्रकचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत. लोहखनिज वाहतुकीमुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.