गडचिरोली पोलीस दलातील ३१ अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपती “पोलीस शौर्य पदक” जाहीर

1596

३९४ जणांना पदोन्नती

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २५ : माओवादविरोधी लढ्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्याला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून गौरवण्यात आले आहे. २०१८ मध्ये बोरीया–कसनासूर परिसरात झालेल्या चकमकीत ४० माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या कारवाईतील अतुलनीय पराक्रमाची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील ३१ पोलीस अधिकारी व अंमलदारांना “पोलीस शौर्य पदक” जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच दलातील ३९४ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे.
२५ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या यादीत देशभरातील एकूण १२१ पोलीस शौर्य पदकांपैकी ३१ पदके गडचिरोली पोलीस दलास प्राप्त झाली आहेत. यापूर्वी २०२५ च्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ७ अधिकारी-अंमलदारांना शौर्य पदक मिळाले होते. मागील पाच वर्षांच्या कालावधीत गडचिरोली पोलीस दलास ३ शौर्य चक्र व २१७ पोलीस शौर्य पदके प्राप्त झाल्याने हे दल देशपातळीवर ठळकपणे पुढे आले आहे.

बोरीया–कसनासूर चकमकीचा ऐतिहासिक पराक्रम

२२ एप्रिल २०१८ रोजी बोरीया–कसनासूर परिसरात पोलीस व माओवाद्यांमध्ये झालेल्या तीव्र चकमकीत गडचिरोली पोलीस दलाने मोठे यश संपादन करत ४० माओवाद्यांना ठार केले होते. या कारवाईदरम्यान दाखवलेल्या शौर्य, धैर्य व रणनीतीपूर्ण कामगिरीमुळे संबंधित अधिकारी व अंमलदारांचा राष्ट्रपती शौर्य पदकासाठी गौरव करण्यात आला आहे.

शौर्य पदक प्राप्त अधिकारी-अंमलदार

पोनि. अमोल फडतरे, पोउपनि. मधुकर पोचय्या नैताम, पोउपनि. वासुदेव राजम मडावी, सफौ विलास मारोती पोरतेट, पोहवा संतोष वसंत नैताम, पोहवा विश्वनाथ सन्यासी सडमेक, पोहवा ज्ञानेश्वर सदाशिव तोरे, पोहवा दिलीप वासुदेव सडमेक, पोहवा रामसू देऊ नरोटे, पोहवा आनंदराव बाजीराव उसेंडी, पोहवा राजु पंडित चव्हाण, पोहवा मोहन लच्छु उसेंडी, पोहवा संदिप गणपत वसाके, पोना अरुण कैलास मेश्राम, पोना सुधाकर बिटोजी वेलादी, पोना नितेश गंगाराम वेलादी, पोना विश्वनाथ लक्ष्मण मडावी, पोना कैलास देवू कोवासे, पोना हरिदास महारु कुलयेटी, पोना किशोर चंटी तलांडे, पोना अतुल भगवान मडावी, पोना अनिल रघुपती आलाम, पोना नरेंद्र दशरथ मडावी, पोना आकाश अशोक ऊईके, पोना घिस्सु वंजा आत्राम, पोना राजु मासा पुसाली, पोना महेश दत्तुजी जाकेवार, पोना रुपेश रमेश कोडापे, पोना मुकेश शंकर सडमेक, पोना योगेंद्रराव उपेंद्रराव सडमेक व पोअं कारे ईरपा आत्राम यांचा समावेश आहे.

३९४ अंमलदारांना पदोन्नती, शहीद जवानांनाही सन्मान

गडचिरोली पोलीस दलातील ३९४ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली असून त्यामध्ये १० अंमलदारांना वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच १४ शहीद पोलीस अंमलदारांना मरणोत्तर पदोन्नती देत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
यात ८२ पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, तर ३०२ पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन

शौर्य पदक व पदोन्नती प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
#lokvrutt #lokvruttnews #gadchirolinews #gadchirolipolice #GadchiroliPolice #PoliceGallantryMedal #BraveryAward #Gallantry
#RepublicDay2026 #AntiNaxalOperation #CounterInsurgency #IndianPolice #PoliceBravery #NationalPride #InternalSecurity #HeroesInUniform
#GallantCops #PolicePromotion #SaluteToBravery