विकसित गडचिरोलीकडे वेगवान वाटचाल : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. 26 :- नक्षलग्रस्ततेच्या ओळखीपलीकडे जात गडचिरोली जिल्हा आता देशातील प्रगतीशील जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण करीत असून, “विकसित गडचिरोलीची पूर्तता वेगवान पद्धतीने करण्यासाठी सर्वांनी एकत्रित सहभाग द्यावा,” असे आवाहन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलीस अधीक्षक निलोत्पल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत सुमारे ३ लाख कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक येत असून, त्यातून १ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. स्थानिक युवकांना प्राधान्य देत शिक्षण व कौशल्य विकासावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात रस्ते, पूल, रेल्वे व विमानतळ प्रकल्पांना गती देण्यात येत असून, भंडारा–गडचिरोली द्रुतगती महामार्गासह अनेक महत्त्वाचे दळणवळण प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महिला बचत गट, एकल महिलांचा सन्मान, आजिविका क्लस्टर आणि कृषी–वनआधारित उद्योगांमुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होत आहे.
पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत एक कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली पोलीस दलाला मिळालेल्या ३१ शौर्य पदकांबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमात परेड, पथसंचलन, प्रात्यक्षिके तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.











