– सनातन धर्म व संस्कृतीला नवी दिशा देणारे भव्य आयोजन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २७ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त गडचिरोली शहरात भव्य विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्म व सनातन संस्कृतीच्या मूल्यांना अधोरेखित करत समाजात ऐक्य, एकात्मता आणि सकारात्मक चेतना निर्माण करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
हे संमेलन बुधवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता संविधान चौकाजवळील प्रांगणात पार पडणार आहे. या भव्य कार्यक्रमाला पं. पू. संत मूरलिधर महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, नागपूर येथील सुप्रसिद्ध वक्ते प्रशांत दाणी हे प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
आयोजकांनी सांगितले की, समाजात नवचेतना निर्माण करणे, नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी वाढवणे, तसेच धर्म, संस्कृती व सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण करणे हे या संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. “आजच्या बदलत्या काळात धर्म आणि संस्कृतीचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांतून समाजाला सकारात्मक दिशा मिळते,” असेही त्यांनी नमूद केले.
संमेलनादरम्यान प्रबोधनपर भाषणे, चर्चासत्रे, सांस्कृतिक सादरीकरणे व मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली असून, नागरिकांना सनातन धर्माची तत्त्वे, परंपरेचे महत्त्व आणि सामाजिक सहकार्याची भूमिका यांची सखोल माहिती मिळणार आहे.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित हा उपक्रम गडचिरोलीसाठी धार्मिक-सांस्कृतिक जागृतीचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे सामाजिक क्षेत्रातील जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.
या संमेलनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार, ऐक्यभावना आणि सांस्कृतिक अभिमान वृद्धिंगत होईल, तसेच युवा पिढी धर्म, संस्कृती व सामाजिक कर्तव्यांविषयी अधिक जागरूक होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.











