_ कोरची पोलिसांत मर्ग दाखल
लोकवृत्त न्यूज
कोरची (जि. गडचिरोली) :- कोरची तालुक्यातील कोटरा ते बोगाटोला मार्गालगत असलेल्या तलावाजवळ एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मृत्यू संशयास्पद असल्याने कोरची पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, २१ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत सदर घटना घडली असावी असा अंदाज आहे. मुलेटीपदाकसा येथील पोलीस पाटील ईश्वरदास सत्तर कल्लो (वय ४४, व्यवसाय शेती) यांनी या संदर्भात कोरची पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व गावकऱ्यांसह घटनास्थळी पाहणी करण्यात आली.
पाहणीत तलावाजवळ मातीने अंशतः झाकलेला अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदर इसमाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, त्याने पॅन्ट व शर्ट परिधान केलेले होते. दोन्ही हातात कडे असून चेहरा पूर्णपणे काळा पडलेला, तसेच शरीरावर अळ्या लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत असून, मृताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे.














