१० वर्षीय चिमुकल्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२ : आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे गरिबी व पालकांच्या स्थलांतरातून आलेल्या एकाकीपणाने एका कोवळ्या जीवाचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली. जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या संस्कार विनोद कन्नाके (वय १०) या बालकाने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
संस्कारचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी तेलंगणा राज्यात मजुरीसाठी गेले होते. घरी एकटाच राहत असलेल्या संस्कारने सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.














