सबका साथ, सबका विकासचा ठोस अर्थसंकल्प : आमदार प्रवीण दटके

164

सबका साथ, सबका विकासचा ठोस अर्थसंकल्प : आमदार प्रवीण दटके

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा असून सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा असल्याचे प्रतिपादन मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी केले. भारतीय जनता पार्टी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने आज सर्किट हाऊस गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृह संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेचे अध्यक्षस्थान आमदार दटके यांनी भूषविले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार व भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते उपस्थित होते. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, गडचिरोली नगराध्यक्षा अॅड. प्रणोती निंबोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले की, शेतकरी, युवक, महिला, आदिवासी समाज, लघुउद्योजक व मध्यमवर्गीय घटकांसाठी हा अर्थसंकल्प अत्यंत आशादायी आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासासाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदींमुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला गती मिळणार आहे. केंद्र सरकारचा “सबका साथ, सबका विकास” हा संकल्प या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येतो, असेही त्यांनी नमूद केले.
माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत करताना गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे विस्तारासंदर्भात माहिती दिली. आदिवासी, वनवासी व दुर्गम भागांच्या विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदी महत्त्वपूर्ण असून गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा अर्थसंकल्प मोलाचा ठरेल, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला भाजप समन्वयक प्रमोद पिपरे, नगर उपाध्यक्ष निखिल चरडे, गटनेते व सभापती अनिल कुनघाकर, महिला व बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार, शिक्षण सभापती हर्षल गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा व नगरसेविका योगिता पिपरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत मान्यवरांनी केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध बाबींचे सविस्तर विश्लेषण करून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. अखेरीस भाजप गडचिरोली जिल्हा वतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले.