स्वातंत्र्यानंतर प्रथमच पहिले लोकप्रतिनिधी म्हणून आमदार डॉ. मिलिंद नरोटे पोहोचले
लोकवृत्त न्यूज
धानोरा : छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम अशा मंगेवाडा गावाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांच्या कालखंडात ज्या गावात एकाही लोकप्रतिनिधीचे पाऊल पडले नव्हते, त्या मंगेवाडा जिल्हा परिषद शाळेत पहिले लोकप्रतिनिधी म्हणून आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी प्रत्यक्ष भेट दिली.
डोंगर-दऱ्या, कच्चे रस्ते आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आमदार डॉ. नरोटे शाळेत पोहोचताच ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी भारावून गेले. “आजवर फक्त निवडणुकांच्या काळात नाव ऐकले; आज प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी आमच्या दारात आले,” अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या.
यावेळी आमदारांनी वर्गात बसून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. तसेच सीमावर्ती व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक, पायाभूत व मूलभूत सुविधांबाबतच्या अडचणी बारकाईने जाणून घेतल्या.
दुर्गमतेमुळे विकासाच्या प्रवाहाबाहेर राहिलेल्या मंगेवाडा परिसराचा कायापालट करण्याचा निर्धार आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी व्यक्त केला. शाळेची इमारत, पिण्याचे पाणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“भौगोलिक अंतर कितीही असले, तरी विकासाचे अंतर आता राहणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी दिला.
या ऐतिहासिक भेटीप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, तालुका महामंत्री शुभाषजी धाईत, कोषाध्यक्ष शुभाषजी खोबरे, युवा नेते श्रीनिवासजी दुलमवार, पवनजी येरमे, अविनाशजी पोरेटी आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून या अतिदुर्गम भागातील प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचा संकल्प केला.
पहिले लोकप्रतिनिधी म्हणून आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या या भेटीने मंगेवाडा शाळेसाठी विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून, सीमावर्ती विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत नव्या आशेची चमक दिसू लागली आहे.














