Home Breaking News गडचिरोली–गुरवळा मार्गावरील जंगलात माजी सैनिकाची गळफास घेऊन आत्महत्या

गडचिरोली–गुरवळा मार्गावरील जंगलात माजी सैनिकाची गळफास घेऊन आत्महत्या

963

गडचिरोली–गुरवळा मार्गावरील जंगलात माजी सैनिकाची गळफास घेऊन आत्महत्या;
– परिसरात खळबळ

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहरातून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गडचिरोली–गुरवळा मार्गावरील जंगल परिसरात एका माजी सैनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ६ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भास्कर गिरमा बांबोडे (वय ४४, रा. वनश्री कॉलनी, गडचिरोली) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, भास्कर बांबोडे हे भारतीय सैन्यात सेवा बजावून निवृत्त झाले होते. बुधवारी (दि. ५ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास त्यांनी गडचिरोली शहरातून गुरवळा मार्गाकडे दुचाकीने प्रस्थान केले. शहरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला त्यांनी आपली दुचाकी उभी केली आणि जवळच्या जंगलात प्रवेश केला. तेथे एका झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुरुवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात रस्त्याच्या कडेला संशयास्पदरीत्या उभी असलेली दुचाकी आली. विशेष म्हणजे त्या दुचाकीवर “Press” असे स्पष्टपणे लिहिलेले होते. त्यामुळे नागरिकांचा संशय बळावला.

त्यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Don`t copy text!