हत्तीरोग निर्मूलन मोहिमेला प्रारंभ ; जिल्हाधिकारी व आमदारांनी स्वतः औषध घेत केली जनजागृती

139

हत्तीरोग निर्मूलन मोहिमेला प्रारंभ ; जिल्हाधिकारी व आमदारांनी स्वतः औषध घेत केली जनजागृती

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ०९ : हत्तीरोगमुक्त गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्वसमावेशक हत्तीरोग प्रतिबंधक औषधोपचार मोहिमेचा आज अधिकृत शुभारंभ करण्यात आला. नागरिकांमध्ये औषधांबाबत विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी स्वतः औषधांचे सेवन करून जनजागृतीचा संदेश दिला.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही मोहिम गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांत राबविण्यात येणार आहे. जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांना त्यांच्या कार्यालयात औषधे वितरित करून मोहिमेचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
एमडीए–आयडीए (Mass Drug Administration – IDA) ही हत्तीरोग निर्मूलनासाठीची प्रभावी उपचार पद्धती असून, या अंतर्गत दोन वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना तीन औषधांचा समन्वित डोस देण्यात येणार आहे. ही मोहिम Directly Observed Treatment (प्रत्यक्षदर्शी औषध सेवन) पद्धतीने राबविण्यात येणार असून, संपूर्ण डोस घेणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाने, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजिता वाडिवे, जिल्हा किटकजन्य रोग सल्लागार राजेश कार्लेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता औषधांचे सेवन करून हत्तीरोगमुक्त गडचिरोलीसाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.