३५ वर्षांची प्रतीक्षा संपणार? घरपट्ट्यांसाठी नगरसेवक देशमुखांची जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट धाव

291

 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- गेल्या तीन ते चार दशकांपासून अतिक्रमित जागेवर वास्तव्यास असलेल्या प्रभागातील नागरिकांच्या घरपट्ट्यांचा प्रश्न अखेर प्रशासनाच्या दरबारात ठामपणे मांडण्यात आला असून, या संदर्भात सकारात्मक हालचाली सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत. नगरसेवक श्रीकांत शरदराव देशमुख यांनी घरपट्ट्यांसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत निर्णायक पाठपुरावा सुरू केला आहे.
५ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरपरिषद येथे पालकमंत्री आशिष जयस्वाल व जिल्हाधिकारी अविनाश पंडा यांची भेट घेऊन देशमुख यांनी संबंधित सर्व कागदपत्रांसह सविस्तर निवेदन सादर केले. प्रभागातील अनेक कुटुंबे ३५ ते ४० वर्षांपासून त्या जागेवर वास्तव्यास असूनही त्यांना घरपट्टे मिळाले नसल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसल्याची गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
घरपट्ट्याअभावी वीज, पाणी, बांधकाम परवानगी तसेच इतर शासकीय सेवांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी १० फेब्रुवारी रोजी चर्चेसाठी वेळ देत विषयाला प्राधान्य दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घरपट्टा वितरण प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. संबंधित नागरिकांचे अर्ज व आवश्यक कागदपत्रे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी या विषयात सहकार्याची भूमिका दर्शविल्याची माहिती मिळाली आहे.
प्रभागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला घरपट्टा मिळवून देणे हे आमचे वचन आहे. प्रशासनाच्या सहकार्याने हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असा विश्वास नगरसेवक श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अनेक वर्षांपासून रखडलेल्या घरपट्टा प्रश्नावर प्रशासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, आता प्रत्यक्षात घरपट्टे वितरणाची प्रक्रिया गती घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.