– धानोरा तालुक्यातील महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल
लोकवृत्त न्यूज
धानोरा : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिलांच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत, धानोरा तालुक्यातील पवनी, तोयागोंदी व मोहली या तीन गावांमध्ये मासिक पाळी विश्रांतीगृहांचे (कुरमाघर) लोकार्पण करण्यात आले. राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या सोहळ्याचा प्रारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे, शिवसेना प्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल, फिनोलेक्सचे अभिषेक राय, मुकुल माधव फाऊंडेशनच्या यामिनी शेख, माँ फाऊंडेशनचे विलासजी कांबळे, युवा परिवर्तनच्या संचालिका दर्शना सावंत व मॅनेजर प्रशांत मंडावार उपस्थित होते.
युवा परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून धानोरा तालुक्यात आतापर्यंत एकूण २९ महिला विश्रांतीगृहांची यशस्वी निर्मिती करण्यात आली आहे. या जाळ्यामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांना हक्काचे आणि सुरक्षित ठिकाण उपलब्ध झाले आहे.
मासिक पाळीदरम्यान दुर्गम व आदिवासी भागातील महिलांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
हा लोकोपयोगी प्रकल्प युवा परिवर्तन, फिनोलेक्स, मुकुल माधव फाऊंडेशन, सस्टेन प्लस (Susten Plus) आणि समस्त गावकऱ्यांच्या सामूहिक सहकार्यातून आकारास आला आहे.
लोकार्पण सोहळ्यात बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, “अशा उपक्रमांमुळे ग्रामीण व आदिवासी भागात मासिक पाळीबाबतची सामाजिक जागरूकता वाढीस लागत आहे. महिलांना आरोग्याच्या आधुनिक सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार असून, या विश्रांतीगृहांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला मोठे बळ मिळत आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश उईके यांनी केले, तर उपस्थित सर्व मान्यवरांची व ग्रामस्थांचे आभार अनिकेत गुरनुले यांनी मानले. या सोहळ्याला पवनी, तोयागोंदी व मोहली परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.











