लोहखनिज भरून जाणाऱ्या भरधाव ट्रकची भीषण धडक

460

लोहखनिज भरून जाणाऱ्या भरधाव ट्रकची भीषण धडक : चालक थोडक्यात बचावले

लोकवृत्त न्यूज
धानोरा : धानोरा–मुरूमगाव मार्गावरील टवेटोला पुलाजवळ मंगळवारी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात घडला. या अपघातात दोन्ही ट्रकच्या कॅबीनचा अक्षरशः चक्काचूर झाला; मात्र सुदैवाने दोन्ही चालक थोडक्यात बचावले.
सूरजागड प्रकल्पातून लोहखनिज भरून छत्तीसगडकडे जाणारा ट्रक (MH 34-BH 9277) आणि छत्तीसगडवरून महाराष्ट्राच्या दिशेने येणारा ट्रक (CG 10-BR 8556) यांच्यात ही धडक झाली. दोन्ही ट्रक वेगात असल्याने धडकेची तीव्रता प्रचंड होती. अपघातानंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या अपघातामुळे टवेटोला पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या यामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस मदत केंद्र, येरगड येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.