मुरूम उत्खननावरून मध्यरात्री थरार आमदार रामदास मसरामांसह सहा जणांवर गुन्हा

1132

मुरूम उत्खननावरून मध्यरात्री थरार आमदार रामदास मसरामांसह सहा जणांवर गुन्हा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १९ : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरात रेल्वे कामासाठी सुरू असलेल्या मुरूम उत्खननावरून मंगळवारी मध्यरात्री तुफान हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार रामदास मसराम यांच्यासह सहा जणांविरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत कुणाल विकास राजगडे (२४, रा. निमगाव) हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढाळा येथे रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मुरूम उपसा सुरू असताना आमदार मसराम आपल्या पाच सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. “येथे मुरूम उत्खनन कशाच्या परवानगीवर सुरू आहे?” अशी विचारणा करत त्यांनी तेथील मजुरांशी हुज्जत घातल्याचे सांगण्यात येते.

यावेळी जखमी मजूर कुणाल राजगडे याने तहसील कार्यालयाची रीतसर परवानगी असल्याचे सांगून संबंधित कंत्राटदाराकडे चौकशी करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यावरून वाद चिघळल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. संतप्त जमावाने कुणालला काठी व हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे नमूद आहे.

या प्रकरणी पोलिसांनी निवृत्त शिक्षक धनपाल मिसार यांच्यासह आमदार रामदास मसराम, अमोल मिसार, सागर वाढई, ज्ञानदेव पिलारे आणि चालक विजय भुरले यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.

विद्यमान आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही मारहाण केवळ मुरूम उत्खननाच्या वादातूनच झाली की यामागे अन्य काही कारण आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

मध्यरात्री संबंधित व्यक्ती घटनास्थळी नेमक्या कोणत्या कारणासाठी उपस्थित होत्या, वादाचे मूळ नेमके काय, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.