गडचिरोलीत ऑइल सांडल्याने दुचाकींची घसरगुंडी; एकाचा गुडघा फ्रॅक्चर

458

– पोलीस दलाच्या तत्परतेने मोठा अपघात टळला

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२१  :- गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावर कारगिल चौक परिसरात शनिवारी २१ फेब्रुवारी २०२६ दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास दुचाकी वाहनाच्या इंजिनमधील ऑइलचा नट निघाल्याने सुमारे १०० मीटरपर्यंत रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना घडली. या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मागून येणारी वाहने घसरू लागली आणि दोन दुचाकी वाहनचालकांचा अपघात झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल पसरल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला होता. त्यात दोन दुचाकीस्वार घसरून पडले. यामध्ये एका व्यक्तीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. जखमीस तातडीने उपचारासाठी शहरातील डॉ. बिडकर दवाखाना येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला असल्याची माहिती मिळाली आहे.

जखमी व्यक्ती हे गडचिरोली पोलीस स्टेशन येथील पीएसआय तरारे यांचे नातेवाईक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, पुढील अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर पोलिस दलाच्या तत्परतेने तातडीने माती टाकून मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला व मोठा अपघात टळला. ही कार्यवाही एपीआय शरद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय वेलादी यांच्या वतीने करण्यात आली.
या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनचालकांनी अशा प्रकारच्या यांत्रिक बिघाडांबाबत दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.