ऑनलाईन ७/१२ साठी ५०० रुपयांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहात अटकेत

722

गडचिरोली महसूल विभागात खळबळ

लोकवृत्त न्यूज
कुरखेडा, दि. २७ : ऑनलाईन ७/१२ उतारा काढून त्यावर सही-शिक्क्यासह प्रत देण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव (साजा) येथील महिला तलाठी सुलोचना विठ्ठलराव कन्नाके (वय ३८) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) गडचिरोली पथकाने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावरील वनपट्ट्याच्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा ऑनलाईन करण्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यानंतर ग्राम महसूल कार्यालय, गोठणगाव येथे ऑनलाईन ७/१२ ची सही-शिक्क्यासह प्रत मागितली असता तलाठी कन्नाके यांनी त्यासाठी ५०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्यास स्पष्ट नकार देत तक्रारदाराने तत्काळ ACB गडचिरोली कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक विकांत सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असलेल्या गोठणगाव परिसरात २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पंचासमक्ष गोपनीय शहानिशा करण्यात आली. शहानिशीदरम्यान तलाठी कन्नाके यांनी ५०० रुपयांची लाच मागून २६ फेब्रुवारी रोजी ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर ACB पथकाने सापळा रचला असता, तलाठी कन्नाके हिने आपल्या राहत्या घरी तक्रारदाराकडून ५०० रुपये स्वीकारताच ACB पथकाने तिला रंगेहात पकडले. या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.