फायलेरियाच्या गोळ्या खाल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

331

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी दि.४ : तालुक्यातील मुरखळा माल येथे हत्ती रोग दुरीकरण (फायलेरिया) मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गोळ्या सेवन केल्यानंतर काही विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावल्याची गंभीर घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांवर सध्या येथे उपचार सुरू असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्य उपकेंद्रामार्फत गावात शालेय शिबिर घेऊन विद्यार्थ्यांना फायलेरिया प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये तसेच येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. गोळ्या घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या, चक्कर, डोकेदुखी व ताप अशी लक्षणे जाणवू लागली. काही ग्रामस्थांनाही अशाच तक्रारी जाणवल्याची माहिती पुढे आली आहे.
विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच पालकांनी तातडीने त्यांना येथे दाखल केले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असून काही विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी गावात भीतीचे वातावरण आहे. रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणी शल्य चिकित्सक डॉ. प्रवीण किलनाके यांनी प्राथमिक प्रतिक्रिया देताना फायलेरिया प्रतिबंधात्मक गोळ्यांमुळे साधारणतः ताप येत नाही, असे मत व्यक्त केले. तर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने मुरखळा माल येथे तातडीने तपासणी शिबिर भरवून ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे.
दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांची प्रकृती नेमकी कशामुळे खालावली याचा तपास करण्यात यावा, तसेच दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.