Home चंद्रपूर कोंडेखल ग्रामपंचायतीतील आर्थिक घोटाळा उघड ; ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे निलंबित

कोंडेखल ग्रामपंचायतीतील आर्थिक घोटाळा उघड ; ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे निलंबित

273

दुसऱ्यांदा झाली कारवाई

लोकवृत्त न्यूज
सावली : सावली तालुक्यातील कोंडेखल ग्रामपंचायतीमध्ये काम न करताच लाखो रुपयांचा आर्थिक गैरप्रकार केल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर अखेर ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

कोंडेखल येथील उपसरपंच नरेश बाबनवाडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बोदलकर व सदस्य रोशन वालदे यांनी ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार पंचायत समितीकडे केली होती. त्यानुसार पंचायत समिती प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष काम न करता शासकीय निधीतील लाखो रुपये खर्च दाखविल्याचे तसेच मागील चार महिन्यांपासून मासिक ग्रामपंचायत सभा न घेण्याचा प्रकार उघडकीस आला. चौकशी अहवालात ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे यांच्या कारभारातील अनियमितता स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या प्रकरणासंदर्भातील बातमी ‘लोकवृत्त न्यूज’ या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्यानंतर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या बातमीमुळे संतप्त झालेल्या संबंधित ग्रामसेवकाने पोर्टल व बातमी प्रसारित करणाऱ्यांवर ५० लाख रुपयांच्या मानहानीच्या दाव्याची धमकी दिल्याचीही चर्चा होती. मात्र, प्रकरण उघड झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई करत रायपुरे यांना निलंबित केले.

ग्रामसेवक धीरधम्म रायपुरे यांच्यावर यापूर्वीही आर्थिक अपहाराच्या प्रकरणात कारवाई झाली होती. भद्रावती पंचायत समिती अंतर्गत मांगली (रै.) ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना गृहकर, सामान्य पाणी कर, विशेष पाणी कर, पंधरावा वित्त आयोग निधी व संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमातून जमा झालेल्या रकमेतून सुमारे ३५ लाख ४ हजार ३९२ रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले होते. त्या प्रकरणातही त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई झाल्याने जिल्ह्यात त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोंडेखल ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक आनंद देवगडे व तत्कालीन सरपंच सरला कोटगले यांचाही सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या दोघांवरही फौजदारी कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली असून, यावर पुढे कोणती कारवाई होते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!