तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त गडचिरोलीत शिवसेनेची भव्य शोभायात्रा

156

• आदिवासी नृत्य, घोडारथ, घोडे आणि ४० फूट उंच फोटोसह इंदिरा गांधी चौकात भव्य देखावा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.५  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शुक्रवार, ६ मार्च रोजी गडचिरोली येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ४ वाजता शिवसेना कार्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली येथून या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा इतिहास व विचारांचा गौरव करण्यात येणार असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी शोभायात्रेत आदिवासी पारंपरिक नृत्य, आकर्षक घोडारथ, घोडे तसेच तब्बल ४० फुटांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य फोटो विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच शहरातील इंदिरा गांधी चौक येथे भव्य देखाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शोभायात्रेत सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन शिवसेना जिल्हा युवा अधिकारी पवन गेडाम यांनी केले आहे.