वैनगंगा नदीत आंघोळीला गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि १० मार्च : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरील वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या एका महिलेचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली शहरातील रामनगर येथील कांताबाई मोहूरले (वय अंदाजे ४५ वर्षे) या आपल्या कुटुंबीयांसह वैनगंगा नदीत आंघोळ करण्यासाठी गेल्या होत्या. आंघोळ करत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन त्या खोल पाण्यात गेल्याने त्या बुडाल्या. कुटुंबीयांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांना वाचविण्यात अपयश आले.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पाण्यात बुडालेला मृतदेह काही वेळानंतर पाण्यावर तरंगताना दिसून आल्याने पोलिसांना मृतदेह शोधण्यात विशेष अडचण आली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान, वैनगंगा नदी परिसरात आंघोळीसाठी व पर्यटनासाठी अनेक नागरिक येत असतात. मात्र याच परिसरात यापूर्वीही अनेक जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.














