ग्रामीण रुग्णांसाठी ‘आयुर्वेद’ ठरतेय संजीवनी ; मौशिखांबच्या तरुणाची सेवा देशसीमेपलीकडे

980

ग्रामीण रुग्णांसाठी ‘आयुर्वेद’ ठरतेय संजीवनी ; मौशिखांबच्या तरुणाची सेवा देशसीमेपलीकडे

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधांचा अभाव जाणवत असताना मौशिखांब येथील एका तरुणाने आयुर्वेदाच्या माध्यमातून समाजसेवेचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. अमोल उंदीरवाडे या युवकाने आंबेडकर चौकात सुरू केलेल्या आयुर्वेदिक उपचार केंद्रामुळे स्थानिकांसह दूरवरच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून, या केंद्राची ख्याती आता थेट नेपाळपर्यंत पोहोचली आहे.
किडनी स्टोन, लकवा, मणक्याचे विकार यांसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांची येथे दररोज मोठी गर्दी होत आहे. पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर आधारित औषधोपचारांमुळे अनेक जुनाट आजारांवर सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने रुग्णांचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे.
या केंद्रात वातविकार, पॅरालिसिस, हृदयविकार, मूळव्याध, किडनी स्टोन, पित्ताशयातील खडे, लिव्हर इन्फेक्शन, गाठी, गॅंग्रीन यांसह मणका, मान, कंबर, गुडघे यांसारख्या हाडांच्या समस्या तसेच स्त्रीरोग आणि इतर गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार केले जातात. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरही सहाय्यक उपचार देण्याचा प्रयत्न येथे केला जात असल्याची माहिती आहे.
महागड्या शहरी उपचारांच्या तुलनेत अत्यल्प खर्चात उपचार उपलब्ध करून देणारे हे केंद्र गरीब व ग्रामीण रुग्णांसाठी ‘आरोग्य संजीवनी’ ठरत आहे. अनेक रुग्णांनी उपचारानंतर प्रकृतीत झालेला फरक अनुभवत इतरांना येथे येण्याचा सल्ला दिल्याने परिसरात या केंद्राबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरावेत यासाठी रुग्णांनी योग्य पथ्य पाळणे अत्यंत गरजेचे आहे. शिस्त आणि संयम राखल्यास अनेक असाध्य आजारांवर मात करता येते,” असे अमोल उंदीरवाडे यांनी सांगितले.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील मर्यादा लक्षात घेता, एका स्थानिक तरुणाने उभारलेली ही सेवा केवळ परिसरापुरती मर्यादित न राहता देशसीमा ओलांडून पोहोचत असल्याने नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे.