Home Breaking News लोहखनिज वाहतुकीविरोधात शिंदेसेनेचा चक्काजाम

लोहखनिज वाहतुकीविरोधात शिंदेसेनेचा चक्काजाम

634

‘जिथे उत्खनन तिथेच उत्पादन’ची मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- सुरजागड परिसरातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या लोहखनिज वाहतुकीविरोधात जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून “जिथे उत्खनन तिथेच उत्पादन” या तत्त्वावर गडचिरोलीतच लोहप्रक्रिया उद्योग उभारण्याची मागणी तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे)च्या वतीने हेमंत जंबेवार यांच्या नेतृत्वात बुधवारी गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील डोंगरगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी लोहखनिज वाहतूक करणारे ट्रक अडवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावेळी बोलताना हेमंत जंबेवार यांनी सांगितले की, सुरजागड येथून दररोज सुमारे ३५०० ट्रक व ट्रेलरद्वारे ५० ते ६० टन लोहखनिजाची वाहतूक चामोर्शी, आरमोरी, धानोरा मार्गे चंद्रपूरकडे केली जाते. या प्रचंड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धूळप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे विशेषतः शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. खनिज वाहतुकीत पारदर्शकतेचा अभाव असून शासनाला मिळणाऱ्या रॉयल्टीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
यावेळी लोहखनिज वाहतूक कोनसरीपर्यंतच मर्यादित ठेवावी, गडचिरोलीतच लोहप्रक्रिया उद्योग तातडीने सुरू करावा, ट्रक वाहतुकीवर कडक नियंत्रण ठेवून वेगमर्यादा लागू करावी, शाळांच्या वेळेत वाहतूक बंद ठेवावी, प्रत्येक गावात वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नेमावेत, तसेच आरटीओमार्फत नियमित तपासणी करून नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. जिल्ह्यातील मौल्यवान खनिज संपत्ती बाहेर जात असताना स्थानिकांना कोणताही लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, येथेच उद्योग उभारून स्थानिकांना रोजगार देण्याची मागणीही करण्यात आली.
या आंदोलनात रेखा डोळस, श्रीदेवी वरगंटीवार, शीतल बनसोड, वसंत गावतुरे यांच्यासह शिवसेना व भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हेमंत जंबेवार व शिवसैनिकांनी दिला आहे.

Don`t copy text!