गडचिरोली : शौचास गेलेल्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

1502

शाळा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

लोकवृत्त न्यूज
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील वडेगाव येथील आश्रम शाळेतील एका ८ वर्षीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वेदांत शंकर पदा (वय ८, रा. नवेझरी, ता. कुरखेडा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो क्रांतीवीर नारायणसिंह उईके आदिवासी आश्रम शाळा, वडेगाव येथे इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होता.
27 मार्च रोजी दुपारी सुमारे २.५० वाजण्याच्या सुमारास वेदांत हा शाळेच्या पाठीमागील तलावाकडे शौचास गेला असता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. ही बाब लक्षात येताच शाळेतील कर्मचारी व इतर विद्यार्थ्यांनी तत्काळ धाव घेत त्याला पाण्याबाहेर काढले. त्यावेळी तो हालचाल करत असल्याने त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.
या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात मर्ग दाखला करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम करीत आहेत.

शाळा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

सदर घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. एवढ्या लहान वयाच्या विद्यार्थ्याने शाळेजवळील तलावाकडे शौचासाठी जाण्याची वेळ का आली? शाळेत शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही का? असल्यास विद्यार्थ्यांना त्याचा वापर करण्यासाठी योग्य देखरेख का नव्हती?
इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे लक्ष नसते काय? विद्यार्थी शाळेच्या परिसरातून बाहेर गेला तरीही कोणाच्या लक्षात कसे आले नाही? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत असून आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.