9 वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण : गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा धक्का

393

9 वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण : गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा धक्का

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. 31 मार्च 2026 :- गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश मिळत 03 एसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह एकूण 09 माओवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले. शासनाने या सर्वांवर एकत्रित 30 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये दसरी ऊर्फ पिडे सन्नु वेको (वय 35, रा. आदवारा, ता. भैरमगड, जि. बिजापूर – बक्षीस 06 लाख), रामजी अडमा पोटाम (वय 40, रा. मोठा पुसनार, ता. व जि. बिजापूर – बक्षीस 06 लाख), शांती वंजा वड्डे (वय 35, रा. कवंडे, जि. बिजापूर – बक्षीस 06 लाख), मनकु मासो पोडाम (वय 35, रा. डोक्के, ता. भैरमगड, जि. बिजापूर – बक्षीस 02 लाख), सरिता रामा वेलकम (वय 25, रा. गंगनपल्ली, ता. आवापल्ली, जि. बिजापूर – बक्षीस 02 लाख), लखमी आयतु कुंजाम (वय 26, रा. गमपूर, ता. व जि. बिजापूर – बक्षीस 02 लाख), नंदे जोगा मडे (वय 22, रा. रामगुंडम, ता. कोंटा, जि. सुकमा – बक्षीस 02 लाख), राकेश कोरके मज्जी (वय 30, रा. तुमरगुंडा, ता. भैरमगड, जि. बिजापूर – बक्षीस 02 लाख) व सुक्की बामी कुंजाम (वय 22, रा. बुसाम, ता. उसूर, जि. बिजापूर – बक्षीस 02 लाख) यांचा समावेश आहे.

आत्मसमर्पणावेळी शांती वंजा वड्डे हिने एके-47 रायफलसह 30 जिवंत काडतुसे तर सुक्की बामी कुंजाम हिने कार्बाईन रायफलसह शरणागती पत्करली. तसेच या माओवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कुमनार जंगल परिसरातून एके-47 रायफल, मॅगझीन, 57 जिवंत काडतुसे, वॉकीटॉकी, बॅटऱ्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय गडचिरोली व छत्तीसगड पोलिसांच्या समन्वयातून गंडापुरी जंगल परिसरातून 7.62 एसएलआर रायफल, सिंगल शॉट बंदूक, 50 डेटोनेटर व अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून संबंधित माओवाद्यांना प्रत्येकी सुमारे 4.5 ते 5.5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक बक्षीस जाहीर करण्यात आले असून, गटाने आत्मसमर्पण केल्याबद्दल अतिरिक्त 4 लाख रुपयांची सामूहिक मदतही देण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली असून, पूर्वी 10 उपविभागांत सक्रिय असलेली चळवळ सध्या भामरागड सीमेपुरती मर्यादित राहिली आहे. शासनाच्या आत्मसमर्पण धोरणामुळे व पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे आजपर्यंत एकूण 805 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून सन 2025 पासून आतापर्यंत 132 माओवादी मुख्य प्रवाहात परतले आहेत.

दरम्यान, 15 ऑक्टोबर 2025 रोजी माओवादी संघटनेचा वरिष्ठ नेता मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भूपती याच्यासह 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आत्मसमर्पणाची गती वाढली असून गडचिरोली पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे माओवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

आत्मसमर्पण कार्यक्रमास सीआरपीएफ व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मानले जात आहे.