शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू ; परिसरात हळहळ

269

शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू ; परिसरात हळहळ

लोकवृत्त न्यूज
आरमोरी, दि.२ एप्रिल : तालुक्यातील ठाणेगाव येथे शेततळ्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, प्रकाश चिचचरे यांच्या शेततळ्यावर काही महिला धुणी करत असताना त्यांना पाण्यावर एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी ही माहिती गावातील अमोल नैताम यांना दिली. नैताम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृतदेह हा त्यांच्या मावशीचा मुलगा अतुल विलास घोडरे (वय २९, रा. ठाणेगाव) याचाच असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पाण्याबाहेर काढला. फिर्यादीच्या तोंडी अहवालानुसार, मृत अतुल हा दारूच्या नशेत शेततळ्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मर्ग नोंद करून पुढील तपास सुरू केला असून पोलीस निरीक्षक गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा प्रेमानंद लाडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.