जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लाच, कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

239

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लाच, कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.०३ :-  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील लाचखोरीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लाच स्वीकारणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहात पकडल्याची कारवाई २ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या मुलीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ३१ मार्च २०२६ रोजी अर्ज सादर केला होता. त्यानंतर प्रकरणाचा पाठपुरावा करताना आरोपी मंगेश मनोहर आंबोरकर (वय ४२, प्रकल्प सहाय्यक – कंत्राटी) यांनी मुदत संपल्याचे कारण सांगत कागदपत्रे अपलोड करून प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ५,००० रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत २ एप्रिल रोजी एसीबी, गडचिरोली येथे तक्रार नोंदविली. एसीबीने पडताळणीदरम्यान आरोपी दिनेश कवडू सिडाम (वय ३८, कार्यालय सहाय्यक – कंत्राटी) याने आंबोरकर यांच्या वतीने २,००० रुपयांची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. पुढे तडजोडीअंती १,००० रुपये स्वीकारण्याचे ठरले. दरम्यान एसीबीच्या पथकाने सापळा रचून दिनेश सिडाम याला १,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे..
सदर कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक विक्रांत सगणे (ला.प्र.वि. गडचिरोली) यांनी काम पाहिले. या सापळा कारवाईत सुनील पेद्दीवार, राजेश पद्मगिरवार, किशोर जौजांरकर, स्वप्नील बांबोळे, प्रविण जुमनाके, नुतेश धुर्वे, संदीप उडान, संदीप घोरमोडे, ज्योत्सना वसाके व राजेश्वर कुमरे यांचा समावेश होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक विक्रांत सगणे करत असून, या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान (एसीबी नागपूर), अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर (ला.प्र.वि. नागपूर) यांचे मार्गदर्शन लाभले.
या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांतील लाचखोरीवर पुन्हा एकदा एसीबीने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

#lokvrutt #lokvruttnews #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #ACBTrap #CorruptionExposed #Gadchiroli #BriberyCase #CasteCertificate #AntiCorruption #RedHanded #BreakingNews #MaharashtraNews